16/06/2021
⬛ घटस्फोट आणि कायदा ⬛
घटस्फोट म्हणजे विवाह - विघटन किंवा वैवाहिक जीवनाचा व संबंधाचा कायदेशीर शेवट. त्यानंतर पति-पत्नी यांचे नाते संपुष्टात येते. घटस्फोटाची विविध कारणे (ग्राउन्ड्स) हिंदू विवाह अधिनियम, १९५५ च्या कलम नं.१३ च्या वेगवेगळ्या उपकलमांमध्ये विस्तृतपणे दिलेली आहेत. त्यांचे पुढे संक्षिप्त विवेचन करण्यात आलेले आहे.
◾न्यायालयीन विभक्ततेसाठी किंवा घटस्फोट हुकूमनाम्यासाठी पीडित पतीला वा पत्नीला प्रतिवादीविरुद्ध खालील नऊ कारणांपैकी कोणत्याही कारणास्तव कलम १३ (१) च्या अनुसार दावा करता येतो.
(१) प्रतिवादीने विवाहानंतर स्वेच्छेने व्यभिचार/परस्रीगमन केला आहे.
(२) प्रतिवादीने वादीस क्रौर्याने (क्रूएल्टी) वागविले आहे.
(३) प्रतिवादीने वादीचा वादीच्या समंतीशिवाय सतत दोन वर्षे त्याग केलेला आहे.
(४) प्रतिवादी धर्मांतर केल्यामुळे हिंदू राहिलेला/ली नाही.
(५) प्रतितिवादी बरा न होण्याइतपत वेडा/वेडी आहे किंवा प्रतिवादीचे मानसिक असंतुलन अशा प्रकारचे आहे, की वादीने प्रतिवादीबरोबर राहावे अशी अपेक्षा करणे योग्य ठरणार नाही. मानसिक असंतुलनामध्ये निरनिराळ्या प्रकारच्या मानसिक अस्वास्थाचा अंतर्भाव करण्यात आला आहे.
(६) प्रतिवादीस भयंकर व असाध्य स्वरूपाचा कुष्ठरोग झालेला आहे.
(७) प्रतिवादीस संसर्गजन्य गुप्तरोग झाला आहे.
(८) प्रतिवादीने संन्यास घेऊन जगाचा त्याग केला आहे.
(९) दाव्यापूर्वी सलग ७ वर्षे प्रतिवादी हयात असल्याचा पुरावा किंवा माहिती ज्यांना त्याचा ठावठिकाणा माहीत असायला पाहिजे, अशा संबंधितांकडे नाही.
◾कलम नं. १३ (१ अ) अन्वये पती वा पत्नी खालील कारणांकरिता एकमेकांविरुद्ध दावा लावू शकतात.
(१) न्यायालयीन विभक्तेचा हुकूमनामा झाल्यापासून एक वर्षापर्यंत पतिपत्नी वैवाहिक जीवनासाठी एकत्रित राहिलेले नाहीत.
(२) दांपत्याधिकाराचे पुनःस्थापन करण्याचा हुकूमनामा झाल्यापासून एक वर्षापर्यंत पतिपत्नी अशा पुनःस्थापनेसाठी एकत्रित राहिलेले नाहीत.
◾कलम नं. १३ (२) अन्वये फक्त पत्नी न्यायालयीन विभक्ततेसाठी किंवा घटस्फोटासाठी खालीलपैकी कोणत्याही कारणास्तव पतिविरुद्ध दावा लावू शकते.
(१) हिंदू विवाह अधिनियम, १९५५ अंमलात येण्यापूर्वीच एखाद्या पुरुषाने दोन वा अधिक विवाह केलेले असतील व दोन किंवा अधिक पत्नी एकसमयी हयात असतील, तर त्यांपैकी कोणतीही पत्नी पतीविरुद्ध घटस्फोट मागू शकते.
(२) विवाहानंतर पती जबरी संभोग, समलिंगी संभोग किंवा पशुसंभोग याबद्दल दोषी ठरला आहे.
(३) पत्नीने पोटगीची हुकूमनामा मिळविल्यानंतर एक वर्षापर्यंत पतिपत्नी विभक्त राहत आहेत.
(४) पत्नीची विवाह तिचे पंधरा वर्षांचे वय पुरे होण्यापूर्वी झालेला आहे व १८ वर्षांचे वय पुरे होण्याअगोदर तिने त्या विवाहाचा प्रत्यादेश किंवा धिक्कार केलेला आहे, म्हणजे तो विवाह झिडकारला आहे.
८५ टक्के लोकांना लागू होणार्यार १९५५ च्या अधिनियमाचा कल प्रामुख्याने विवाहबंधन शिथिल करण्याकडे किंवा तोडण्याकडे नसून ते जतन करण्याकडे आहे. याशिवाय या अधिनीयमामध्ये पोटगी व निर्वाह, अज्ञान मुलांचा ताबा, उभयतांच्या संयुक्त मालकीच्या मालमत्तेची विभागणी इ. बाबींसंबंधी तरतूद करण्यात आली आहे.
वरील एकूण सर्वच कारणापैकी धर्मांतर, संन्यास व ७ वर्षे हयात असल्याची माहिती उपलब्ध न होणे, ही तीन कारणे वगळता अन्य कोणत्याही कारणासाठी वादीने घटस्फोटाचा दावा लावलेला असल्यास एकंदर परस्थितीचा साकल्याने विचार करून घटस्फोटाऐवजी न्यायालय फक्त न्यायालयीन विभक्तेतेचा हुकूमनामा देऊ शकते.
◾कलम नं. २३ (२) च्या तरतुदीनुसार या अधिनियमान्वये* कोणत्याही स्वरूपाचा हुकूमनामा देण्याअगोदर उभयपक्षांमध्ये समझोता व मनोमिलन घडवून आणण्याचा कसोशीने प्रयत्न करणे, हे न्यायालयाचे अपरिहार्य कर्तव्य ठरते. तसेच प्रत्येक वैवाहिक दावा जाहीरपणे आम जनतेसमोर न चालविता बंदिस्त न्यायचौकशी (ट्रायल इन कॅमेरा) पद्धतीने चालविण्यात येतो.
काही अपवादात्मक परिस्थिती वगळता विवाहाला एक वर्ष पुरे होईपर्यंत पतीला वा पत्नीला न्यायालयीन विभक्ततेसाठी किंवा घटस्फोटासाठी अर्ज करता येत नाही.
वरील तरतुदी पाहता असे दिसते, की भारतातील लोकसंख्येपैकी सु. ८० उपरोक्त अधिनियमामध्ये १९७६ मध्ये दुरुस्ती होऊन एक अतिशय महत्त्वाची अशी, वधूवरांच्या परस्परसंमतीने घटस्फोट घेण्याची सोय करण्यात आली आहे.
◾कलम नं. (१३ ब) या नवनिर्मित तरतुदीमुळे पती व पत्नी यांना एकमेकाविरुद्ध कोणतेही आरोप न करता संयुक्तपणे न्यायालयाकडे घटस्फोटासाठी अर्ज करता येतो. सदरहू अर्जामध्ये ‘आम्ही एकत्र राहू शकत नाही व आमच्या विवाहाचे विघटन व्हावे असे दोघांनीही ठरविले आहे’, असे प्रतिपादन करावे लागते. अर्ज करण्यापूर्वी किमान एक वर्ष पतिपत्नी एकमेकांपासून विभक्त राहत असले पाहिजेत. अर्ज केल्यानंतर सहा महिन्यांच्या अगोदर नाही व अठरा महिन्यांच्या नंतर नाही अशा अवधीमुळे पतिपत्नींनी आपला अर्ज विचारात घ्यावा, अशी विनंती केल्यावर न्यायालय एकंदर परिस्थितीचा सारासार विचार करून व उभयपक्षांनी केलेल्या प्रतिपादनाची सत्यासत्यता पडताळून घेऊन घटस्फोटाचा हुकूमनामा देऊ शकते.
▪️~ॲड.विश्वनाथ माधव मनोरे▪️
▪️मो.८१८१०६११११▪️