19/06/2016
उद्याच्या युवारंगमध्ये अंकात
-------------------------------
भारतीय वन सेवे (ISF)च्या आव्हानात्मक मार्गाची निवड करणाऱ्या महाराष्ट्रातील पहिल्या महिला वन अधिकारी श्रीमती अनिता पाटील यांच्या खडतर यशाची कहाणी.
------------------------------------------------
वन विभागातील मराठमोळी तेजस्विनी
"अनिता पाटील'
कोयनेच्या कुशीत वसलेल्या पाटण (जि. सातारा) येथील मारूल हवेली या छोट्याशा खेड्यातील सामान्य शेतकरी कुटुंबात त्या जन्मल्या. शालेय वयापासूनच "आयपीएस' व्हायचं, असं त्यांनी स्वतःला ठणकावून सांगितलं. त्यानंतर त्याच ध्येयाकडे सरसावण्यासाठी प्रयत्नांचं सातत्य ठेवलं. आयुष्यातील चढ-उतारांना खंबीरपणे सामोरे जात केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. "आयपीएस' होण्याची इच्छा पूर्ण झाली नसली, तरी "आयएफएस' (इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेस) राष्ट्रीय स्तरावरील गुणवत्ता यादीत 43 व्या क्रमांकाने त्या उत्तीर्ण झाल्या. इतकेच नव्हे, तर पहिल्या महाराष्ट्रीय महिला आयएफएस अधिकारी बनून त्यांनी इतिहास रचला. हे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणजे उपवनसंरक्षक (पश्चिम विभाग) अनिता पाटील!
- अरुण मलाणी
----------------------
अनिता पाटील यांचे वडील जयसिंग पांडुरंग पाटील अशिक्षित. तरी शेती सांभाळून आपल्या मुलांनी चांगले शिक्षण घ्यावे, हे ध्येय त्यांनी कायम ठेवलं. शिक्षणात खंड पडणार नाही, याची पुरेपूर काळजीही घेतली. त्यांचे चौथीपर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषद शाळेतून, तर गावातील "रयत'च्या शाळेतून विज्ञान शाखेतून बारावी पूर्ण केली. शालेय वयात टीव्ही मालिकेत "कविता चौधरी' या पोलिस अधिकाऱ्याच्या पात्राचे प्रचंड आकर्षण होते. नववीत शिकत असताना शाळेला संस्थापक सदस्यांच्या आयपीएस झालेल्या मुलाने भेट दिली. तिथेच अनिता पाटील यांनी स्पर्धा परीक्षेच्या तयारीचा निश्चय केला. आई मंगल पाटील चौथी उत्तीर्ण असल्यानं त्यांनी लेकीच्या पोलिस अधिकारी होण्याच्या निश्चयाला पाठिंबा दिला, तर वडिलांनी आर्थिक अडचण भासू न देण्याची जबाबदारी उचलली.
इयत्ता दहावी-बारावीत चांगले गुण मिळवूनही पदवी शिक्षणासाठी अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय क्षेत्र न निवडता बी.एस्सी.साठी कऱ्हाडच्या यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स महाविद्यालयात प्रवेश घेतला. हा निर्णय आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. भूगर्भशास्त्र विभागप्रमुख उमरजीकर यांच्या मार्गदर्शनाने स्पर्धा परीक्षेला पूरक ठरणाऱ्या भूगर्भशास्त्र या विषयातून बी.एस्सी. पूर्ण केले. पुढील तयारीसाठी पुणे गाठण्याचा श्री. उमरजीकर यांचा सल्ला मानून अपरिचित पुण्यात जाऊन त्यांनी पुणे विद्यापीठात भूगर्भशास्त्रातून एम.एस्सी.साठी प्रवेश घेतला. यादरम्यान स्पर्धा परीक्षांचा आवाका लक्षात घेत तयारी सुरू केली.
ग्रामीण पार्श्वभूमी असतानाही आई-वडिलांकडून शिक्षणाला सदैव पाठिंबा मिळाला; परंतु भविष्यातील येऊ शकणारा सामाजिक दबाव, बेभरवशाच्या शेतीवर अवलंबून असलेल्या आर्थिक परिस्थितीचा साकल्याने विचार त्यांनी केला. त्यांनी एम.एस्सी. करीत असतानाच "सेट' परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश मिळविले. त्यानंतर वेळ वाया न घालवता त्या केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेच्या तयारीकडे वळाल्या.
------------------
क्लाससाठी आईने मोडले दागिने
यूपीएससी उत्तीर्ण होण्याचे कडवे आव्हान स्वीकारल्यावर सुरवातीच्या दोन प्रयत्नांत पूर्वपरीक्षेत अपयश आले. त्यांची लढाऊवृत्ती आणखी टोकदार झाली. ऑगस्ट 2003 मध्ये दिल्लीत खासगी क्लास लावण्याचा निर्णय घेतला. नेहमी खंबीरपणे पाठीशी उभ्या राहणाऱ्या आईने स्वत:चे दागिने मोडले. या गोष्टीचा ताण आल्यामुळे तिसऱ्या प्रयत्नातही अपयशच पदरी पडले.
---------------------------
प्रत्येक प्रश्नातून मिळाले शिकायला
दरम्यान, त्यांनी अपयशाचे नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न केला. आपला कल नसलेले विषय स्पर्धा परीक्षेसाठी निवडायला नको, हे महत्त्वाचे कारण गवसले. त्याच वेळी केवळ यूपीएससी न करता एमपीएससीचीही तयारी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, या दोन्ही परीक्षांच्या तारखांच्या ओढाताणीतून परीक्षांत यश मिळत नव्हते.
--------------------
अर्थार्जनासाठी अडीच हजारांच्या नोकरीचा स्वीकार
कुटुंबाकडून पाठिंबा असला, तरी मात्र त्यासाठी कुटुंबाची होणारी ओढाताण त्यांना जाणवली. ऑगस्ट 2004 मध्ये पुण्यातील वाडिया महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून नोकरीला सुरवात केली. त्या "सेट' परीक्षा सुरवातीलाच उत्तीर्ण झाल्या असल्याने पुणे, कोल्हापूर विद्यापीठांच्या नोकरीच्या संधी नाकारल्या. या वेळी मात्र त्यांनी केवळ अडीच हजारांच्या नोकरीने अर्थार्जनाला सुरवात केली. पहिला पगार हाती पडल्यावर अश्रू अनावर झाल्याची भावना त्या व्यक्त करतात.
-----------
अखेर "एमपीएससी'मध्ये आले यश
विद्यापीठाची चांगल्या पगाराची नोकरी नाकारून चूक केल्याचा विचारही मनाला शिवला, पण तो विचार झटकून टाकला. "ऑल इंडिया सर्व्हिसेस'चं स्वप्न नसानसांत धावत होतं. वाडिया महाविद्यालयात नोकरी सुरू असताना एमपीएससी परीक्षेत यश आले. या यशानंतर पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्रालयातील भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा या विभागात कनिष्ठ भूवैज्ञानिक या वर्ग-2 च्या पदावर निवड झाली अन् ऑक्टोबर 2005 मध्ये या पदावर पुणे येथील कार्यालयात त्या रुजूदेखील झाल्या.
-------------- ..तरी स्पर्धा परीक्षांनी झपाटलेल्याच
एमपीएससीद्वारे चांगल्या पगाराची नोकरी मिळाली होती. पण "ऑल इंडिया सर्व्हिसेस'च्या अपुऱ्या स्वप्नाची खदखद मनात कुठेतरी होती. स्वप्नपूर्तीसाठी पुढेही स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू ठेवली. कामकाज आणि अभ्यास यात समन्वय साधणे तसे सोपे नव्हते. मिळणारा पगार अन् रजा यांचा पुरेपूर उपयोग करून घेत, तसेच छोटा भाऊ (विजय पाटील) याच्या आर्थिक पाठबळातून तयारीत खंड पडू दिला नाही.
----------------
समीर चव्हाण... मिळाले खंबीर साथीदार
पुणे येथे नोकरीदरम्यान डिसेंबर 2008 मध्ये समीर चव्हाण यांच्याशी अनिता पाटील यांचा विवाह झाला. जोडीदारासोबत कधी स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शक, तर कधी टीकाकार, विश्वास देणारा मित्र, अशा नानाविध भूमिकांतून समीर यांचे पाठबळ लाभल्याचे सौ. पाटील सांगतात.
----------
प्रयत्नांना मिळू लागले फळ
महाराष्ट्र वनसेवा परीक्षा 2007 च्या माध्यमातून सहाय्यक वनसंरक्षक आणि तद्नंतर 2008 मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेतल्या जाणाऱ्या जिओलॉजिस्ट(ग्रुप ए)साठी निवड झाली. या यशामुळे "इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेस' परीक्षा देण्याबद्दल आत्मविश्वास आला. जुलै 2008 मध्ये "आयएफएस' परीक्षेसाठी पहिला प्रयत्न केला. पहिल्याच प्रयत्नात मुलाखतही दिली. पण अवघ्या 45 गुणांमुळे अंतिम यादी हुकली. पुन्हा चुका सुधारून जुलै 2009 मध्ये "आयएफएस'ची मुख्य परीक्षा दिली आणि सहाय्यक वनसंरक्षक पदाच्या प्रशिक्षणासाठी डेहराडून येथे त्या रुजू झाल्या. 17 फेब्रुवारी 2010 मध्ये मुलाखत झाल्यानंतर 5 मार्च 2010 ला निकाल जाहीर झाला. या विभागातील निवडीतून निसर्गाशी त्यांची नाळ जुळली.
-------------------
ऑल इंडिया रॅंकिंगसोबत रचला इतिहास
या परीक्षेत केवळ यश न मिळवता अनिता पाटील यांनी अंतिम निकालात ऑल इंडिया रॅंकिंगमध्ये 43 वा क्रमांक पटकावला. महाराष्ट्रातून यशस्वी होणाऱ्या त्या एकमेव उमेदवार होत्या. इतकेच नव्हे, तर महाराष्ट्राच्या वन खात्यातील इतिहासात म्हणजेच स्वातंत्र्यप्राप्तीनंतर 1966 ला भारतीय वनसेवा स्थापन झाल्यापासून महाराष्ट्रात रुजू होणाऱ्या पहिल्या महाराष्ट्रीय महिला अधिकारी होण्याचा मान त्यांनी मिळवत इतिहास रचला.
-----------------
पहिल्याच नियुक्तीत कारवाईचा धडाका
परीवीक्षा (प्रोबेशन) कालावधी नाशिकला झाल्यानंतर 3 एप्रिल 2013 ला पश्चिम विभागाच्या उपवनसंरक्षकपदी नेमणूक मिळाली. आपल्या पहिल्या नियुक्तीतच सौ. पाटील यांनी धडाकेबाज कारवाई करत नियमांचे पालन न करणाऱ्यांवर जरब बसविला. यात प्रामुख्याने त्र्यंबकेश्वर परिसरात केलेल्या कारवाईत सिंह, बिबट्याची नखे जप्त केली. आंतरराज्य टोळी उघडकीस आणत त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला. विविध स्तरांवर कारवाई करत त्यांनी कायद्याकडे दुर्लक्ष करणाऱ्यांना वठणीवर आणले.
---------------------
निसर्गाचे संरक्षण करणे प्रत्येकाचे कर्तव्य
निसर्गाचा ऱ्हास हा चिंतेचा विषय बनला आहे. निसर्गाचे, जंगलांचे व अन्य नैसर्गिक साधनसंपत्तीचे संरक्षण करणे, हे केवळ शासकीय यंत्रणेचे काम नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे, असे खंबीर मत त्या व्यक्त करतात. लोकसहभागाशिवाय एकटा वन विभाग किंवा कुठलाही अन्य विभाग काहीच करू शकत नाही. लोकांच्या पाठबळाची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
---
भटकंतीचा छंद देतो विरंगुळा
व्यस्त नोकरी, कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळून त्या भटकंतीचा छंद जोपासतात. निवांत वेळी टीव्ही पाहणे, विशेषत: विनोदी चित्रपट पाहायला आवडत असल्याचे त्या सांगतात. मोटारसायकलवरून रायडिंग, सायकलिंग यातून जीवनाचा आनंद घेण्याचा नेहमीच प्रयत्न असल्याचे त्या सांगतात.
00000