का? कायद्याचा. By Adv. Vikee Yelve

  • Home
  • India
  • Mumbai
  • का? कायद्याचा. By Adv. Vikee Yelve

का?  कायद्याचा. By Adv. Vikee Yelve Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from का? कायद्याचा. By Adv. Vikee Yelve, Criminal lawyer, Mumbai.

https://www.facebook.com/101263048948801/posts/108286174913155/
02/10/2021

https://www.facebook.com/101263048948801/posts/108286174913155/

*प्रकरण चौथे*
*झडती*
झडती म्हणजे कायद्याच्या दृष्टीने सरकारी अधिकृत व्यक्तीने सामानसुमान, कागदपत्रे इत्यादींची केलेली बारीक तपासणी किंवा पाहणी असा तिचा अर्थ आहे.

चोरलेला, निषिद्ध माल, त्याचप्रमाणे आरोपाच्या पुष्ट्यर्थ पुरावा शोधण्याच्या दृष्टीने अशी झडती घेण्यात येते.

जागेची, तसेच आवश्यकता वाटल्यास अंगाचीही, झडती घेण्यात येते.

स्त्रियांची झडती स्त्रियांमार्फत व सभ्यतेस बाध न आणता घेण्याचे कायद्याने बंधन आहे.

हवा असलेला दस्तऐवज किंवा वस्तू, चोरलेला माल, बनावट नाणी, खोटी मोहर, सरकारने आक्षेपार्ह ठरविलेले किंवा जप्त म्हणून घोषित केलेले लिखाण इत्यादींकरिता न्यायालय झडती-अधिपत्र काढून पोलिसांना झडती घेण्याचा आदेश देऊ शकते.

त्याचप्रमाणे एखाद्यास एखाद्या जागी बेकायदेशीर अटकेत ठेवल्यास जिल्हा दंडाधिकारी, उपविभागीय दंडाधिकारी किंवा प्रथम दर्जाचा दंडाधिकारी यांस सकारण वाटले, तर ते झडती-अधिपत्र काढू शकतात.

ज्या व्यक्तीच्या नावे असे अधिपत्र काढले गेले असेल, ती व्यक्ती अधिपत्राप्रमाणे बंदिस्त व्यक्ती शोधण्यासाठी झडती घेऊ शकते.

हे अधिपत्र न्यायालयाच्या कक्षेबाहेरचेही असू शकते.

सामान्यपणे पोलिसांनी झडतीकरिता दंडाधिकाऱ्याकडे अर्ज करावयास पाहिजे, पण फौजदारी प्रक्रिया संहितेच्या १६५ कलमानुसार अधिपत्राशिवायही झडती घेण्याचा अधिकार पोलिसांना आहे.

मात्र त्याकरिता पुढील गोष्टींची पूर्तता होणे आवश्यक असते : *(१) अन्वेषणाकरिता झडती आवश्यक असली पाहिजे*

*(२) गुन्हा दखली असला पाहिजे.*
*(३) आवश्यक वस्तू एखाद्या जागी सापडेल असे वाटण्यास वाजवी कारणे असली पाहिजेत.*
*(४) इतर कोणत्याही मार्गाने वस्तू मिळविण्यास अकारण विलंब होईल, अशी परिस्थिती असली पाहिजे.*
*(५) झडतीची आवश्यकता वाटणाऱ्या वाजवी कारणांची पोलिसांनी पूर्वनोंद करावयास पाहिजे.*
*(६) अभिलेखात शक्य तो झडतीची वस्तू विनिर्दिष्टित करावयास पाहिजे*.

तारतम्यहीन किंवा बेछूटपणे झडती घेतली जाऊ नये, सत्तेचा दुरुपयोग होऊ नये किंवा निष्कारण कोणी सतावला जाऊ नये म्हणून अधिपत्राशिवाय झडती घेणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यावर झडतीच्या कारणांची नोंद अभिलेखात करण्याचे बंधन घातले आहे.

अभिलेखाच्या प्रती न्यायालयाकडे झडती घेण्यापूर्वी पाठविणेही आवश्यक आहे, नाही तर झडतीला विरोध करणे गुन्ह्यात मोडणार नाही.

अर्ज देऊन न्यायालयाकडून अधिपत्र मिळविण्यास वेळ नसला तर किंवा झडती प्रकरणी उशीर झाल्यास झडतीचा उद्देश साध्य होणार नसेल, तरच १६५ कलमातील तरतुदींचा फायदा घेता येतो.

अदखली गुन्हाप्रकरणी जर पोलिसाने झडती घेतली, तर नुकसानभरपाईची जबाबदारी त्याच्यावर पडते.

काही तरी सापडेल तर पहावे म्हणून झडतीच्या तरतुदीचा फायदा घेणे वरील कलमान्वये अधिकाराबाहेरचे आहे.

सार्वत्रिक झडती घेण्यास पोलिसांना प्रतिबंध करण्याचाही या तरतुदीचा उद्देश आहे. सेंट्रल एक्साइज व सॉल्ट टॅक्स ॲक्ट १९४४ कलम १८ नुसार करण्यात आलेल्या नियमांपैकी नियम २०१ अन्वये घेण्यात येणारी झडतीही कलम १६५ प्रमाणे असावयास पाहिजे.

पोलीस-केंद्राच्या कक्षेबाहेर झडती घेतल्यास या कलमान्वये ती अवैध ठरते; तरी पण फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम ४१ आणि १०२ यांनुसार झडती किंवा अटक करण्याच्या पोलिसाच्या अधिकारास त्यायोगे बाध येत नाही.

साधारणतः कक्षेच्या बाहेर झडती घेऊ नये, असे असले तरी आणीबाणीच्या प्रसंगी एका पोलीस ठाण्याचा अधिकारी दुसऱ्या पोलीस ठाण्याच्या अधिकाराच्या क्षेत्रात झडती घेऊ शकतो.

पुन्हा कलम १६६ अन्वये एका पोलीस ठाण्याचा अधिकारी दुसऱ्या पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यास त्याच्या हद्दीत झडती घेण्याचा अधिकारही देऊ शकतो.

दोन किंवा अधिक साक्षीदारांच्या उपस्थितीत झडती घ्यावी लागते.

हे साक्षीदार शेजारील किंवा कमीत कमी त्याच आळीतील असणे जरूर आहे.

झडतीत सापडलेल्या वस्तूंची त्यांच्या ठिकाणासह यादी करून वरील साक्षीदारांच्या स्वाक्षऱ्या घ्याव्या लागतात.

अर्ज दिल्यास त्याची एक प्रत मालकाला किंवा कबेजदाराला विनामूल्य द्यावी लागते. झडतीत सापडलेल्या वस्तू यादीसह दखल घेण्यास पात्र असलेल्या न्यायालयासमोर ताबडतोब हजर कराव्या लागतात.

झडतीच्या वेळी जागेच्या ताबेदारास किंवा त्याच्यातर्फे एखाद्या व्यक्तीस उपस्थित राहता येते. अधिपत्राधारे झडती घेण्याकरिता येणाऱ्या अधिकाऱ्यास किंवा व्यक्तीस प्रवेश व आवश्यक सवलती द्यावयास पाहिजेत; नाही तर अशा अधिकाऱ्यास कलम ४७ प्रमाणे घरात घुसण्याचा व अडथळे दूर करण्याचा अधिकार आहे.

झडतीत प्राप्त झालेला वस्तूंचा पुरावा विश्वासार्ह् असेल, तर झडती अवैध आहे किंवा कायद्याच्या काही तरतुदींचे पालन करण्यात आले नाही, म्हणून तो पुरावा अग्राह्य ठरणार नाही किंवा सुनावणीत काही दोष राहणार नाही. आंतरराष्ट्रीय कायद्यातही झडतीची तरतूद आहे.

या तरतुदीने परकीय राष्ट्रांच्या खाजगी जहाजांची झडती घेण्याचा युद्धनौकेला अधिकार आहे.

युद्धकाळात एखादे युद्धमान राष्ट्र मुक्त सागरात शत्रुदेशाच्या नागरिकांची मालमत्ता हस्तगत करण्याकरिता किंवा शत्रुराष्ट्राच्या बंदराला जात असलेल्या निषिद्ध वस्तू काढून टाकण्याकरिता एखाद्या तटस्थ राष्ट्राच्या जहाजाची झडती घेऊ शकते. जर झडतीस हिंसात्मक प्रतिकार झाला, तर युद्धनौकेस जहाजावर आक्रमण करून ते जहाज किंवा जहाजी माल नष्ट करण्याचा किंवा पकडण्याचा अधिकार प्राप्त होतो.

शांततेच्या काळात साधारणतः या झडतीच्या अधिकाराचा वापर राष्ट्राच्या सागरी सीमेच्या मर्यादेत देखरेख करण्याच्या निमित्ताने करण्यात येतो.

चाचेगिरी, मासेमारी-विनियमांचे उल्लंघन किंवा केबल्समध्ये अडथळा आणल्याचा संशय किंवा समुद्राची राष्ट्रीय कक्षा उल्लंघून मुक्त सागरात पळून गेलेल्या जहाजाचा पाठलाग यांव्यतिरिक्त इतर कारणांखाली मुक्त सागरात झडती घेणे प्रायः समर्थनीय नसते.

*येणे प्रमाणे चौथे प्रकरण समाप्त*

वि. वा. येलवे
वकील उच्च न्यायालय
८८९८३४३२८९.

*जनहिता करता तुम्ही ही माहिती तुमच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर ती प्रसारित करू शकता*

तसेच ज्यांना कुणाला *कायदा प्रशिक्षण अभियाना* मध्ये सहभागी व्हायचे असेल त्यांनी ८८९८३४३२८९ क्रमांकावर संपर्क साधावा

#कायदा #समाजकल्याण #मराठीसाहित्य

*प्रकरण दुसरे**पोलिस तपास*(सिद्धांत)एखादा दंडार्ह गुन्हा प्रत्यक्ष घडलेला असून तो अमुक एका व्यक्तीने केलेला आहे, हे सिद्...
28/09/2021

*प्रकरण दुसरे*
*पोलिस तपास*(सिद्धांत)
एखादा दंडार्ह गुन्हा प्रत्यक्ष घडलेला असून तो अमुक एका व्यक्तीने केलेला आहे, हे सिद्ध करण्यासाठी न्यायालयात ग्राह्य ठरेल असा पुरावा जमा करणे, म्हणजेच गुन्ह्याचा तपास होय.

*दंडार्ह गुन्हे दोन प्रकारचे असतात* :

१.फिर्यादीच्या तक्रारीवरून वा
२. नुसती कुणकुण लागल्यावरून ज्याचा शोध पोलिस अधिकारी स्वतःच करू शकतात, त्या गुन्ह्यांना दखली किंवा पोलिस कक्षेतील गुन्हे म्हणतात.

ज्या गुन्ह्यांसाठी साधारणपणे सहा महिने वा त्यांहून अधिक सक्तमजुरीची सजा असते, असे भारताच्या फौजदारी व इतर कायद्यांत नमूद केलेले गुन्हे पोलीस कक्षेत येतात. इतर कित्येक गुन्ह्यांचा तपास दंडाधिकाऱ्याच्या हुकुमावाचून पोलिसांना करता येत नाही.

फिर्यादीने तक्रार केल्याविना गुन्ह्याचा तपास करू नये, असा नियम प्राचीन काळी भारतात होता; पण चाणक्याने तो बदलून काही लोकांनी –उदा., ब्राह्मण, तपस्वी, वृद्ध, रोगी, स्त्रिया, मुले व अनाथ माणसे– फिर्याद केली नसली, तरीही पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध घडलेल्या गुन्ह्यांचा तपास करावा अशी आज्ञा दिली.

गेल्या शतकापर्यंत पाश्चात्य राष्ट्रांत देखील फिर्यादीची तक्रार आल्यावाचून पोलिसांना गुन्ह्याचा तपास करता येत नसे.

*गुन्ह्याची तपासणी म्हणजे न्यायालयात ग्राह्य ठरेल असा पुरावा गोळा करणे*.

कोणत्या प्रकारचा पुरावा न्यायालयाने ग्राह्य मानावा, याविषयी निरनिराळ्या देशांत निरनिराळ्या काळी भिन्न भिन्न प्रथा रूढ होत्या.

गुन्हा घडतानाच तो डोळ्यांनी पाहिलेले चार साक्षीदार मिळाल्यास गुन्हा घडला व तो विवक्षित व्यक्तीने केला असे मानावे, असा कायदा मध्ययुगीन इस्लामी राजवटीत असे.

अर्थातच असे साक्षीदार मिळवणे, हाच त्या काळी गुन्ह्याच्या तपासाचा मुख्य उद्देश असे.

*ज्या देशात ब्रिटिश धर्तीवरची न्याययंत्रणा आहे, तेथे पोलिसांना फार मोठ्या प्रमाणावर पुरावा गोळा करावा लागतो. कारण आपण गुन्हा केलेला नाही, हे सिद्ध करण्याचे दायित्व आरोपीवर नसतेच.*

*फिर्यादी पक्षाचा पुरावा वादातीत नसल्यामुळे आपण गुन्हा केल्याचे निःसंदेह सिद्ध झालेले नाही एवढेच आरोपीने निदर्शनास आणले, तरी त्याच्यावरील गुन्ह्याचा आरोप नाशाबीत ठरतो.*

*आरोपी स्वतःच साक्षीदार म्हणून जबानी देण्यास पुढे आल्याखेरीज, फिर्यादी पक्षाला न्यायालयात आरोपीची उलटतपासणीही करता येत नाही.*

*कोर्टाने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देतानाही खरी माहिती देण्याचे किंवा स्वतःचा गुन्ह्यांशी संबंध असल्याचे दर्शविणारी कोणत्याही स्वरूपाची कबुली देण्याचे बंधनही आरोपीवर नसते.*

*भारतासारख्या देशात तर आरोपीने पोलिसांसमोर गुन्हा कबूल केला असला, तरी त्याचा लेखी कबुलीजबाबही पुराव्यात ग्राह्य मानता येत नाही*. उलट आधुनिक पाश्चात्य राष्ट्रांतील न्यायालयेदेखील आरोपीने पोलिसांपुढे दिलेला कबुलीजबाब पुरावा म्हणून ग्राह्य मानतात.

फ्रान्ससारख्या काही देशात तर आपण गुन्हा केलेला नाही, हे सिद्ध करण्याचे दायित्व आरोपीवरही असते.

*भारतात मात्र गुन्हातपासणीच्या कामात स्वतंत्र पुरावा गोळा करण्यावरच अधिक भर द्यावा लागतो.*

कौटिल्याच्या वेळी आरोपीला साक्षीदारांसमक्षच प्रश्न विचारून गुन्ह्याची शहानिशा करून घेता येई.

*आरोपीने मागणी केल्यास पोलिसांच्या तपासाच्या कोणत्याही अवस्थेत त्याला केव्हाही वकिलाचा सल्ला घेता येतो.*

पुरातन काळी गुन्ह्याची कबुली मिळविण्यासाठी संशयिताला मारहाण करण्याचा मार्ग राजमान्य झालेला होता; पण आज मारहाण केल्याचे आढळून आल्यास उलट ती करणाऱ्या पोलिसालाच शिक्षा भोगावी लागते.

तसेच आरोपीला पकडल्यानंतर फक्त चोवीसच तास पोलिस त्याच्याजवळ पूसतपास करू शकतात.

त्यानंतरही पोलिसांना आरोपी पोलिसांच्या कैदेत रहावयास हवा असल्यास त्याला दंडाधिकाऱ्यापुढे हजर करून अधिक काळ पोलिस कैदेत ठेवण्याची मागणी मंजूर करून घ्यावी लागते. असल्या नानाविध तरतुदींपायी आज प्रत्यक्ष संशयिताजवळ पूसतपास करण्याचे महत्त्व भारतात तरी खूपच कमी झाले आहे.

पुराव्याच्या कायद्यांचा गुन्ह्याच्या तपासणीवर मौलिक स्वरूपाचा परिणाम कसा होत असतो, याची साक्ष यावरून पटेल.

*गुन्ह्याच्या तपासणीचे तीन प्रमुख भाग असतात* :

(१) गुन्हा घडला आहे की नाही याची खात्री करून घेणे.

(२) तो घडला असेल, तर तो कोणी केला याचा शोध करणे.

(३) न्यायालयात ग्राह्य ठरेल, अशा प्रकारचा पुरावा गोळा करणे.

यासाठी तपासणी अधिकारी सर्वसाधारण शिक्षण, पोलिस कामगिरीचे प्रशिक्षण आणि अनुभव या तीनही गोष्टींत तरबेज असावा लागतो.

गुन्हातपासणी हे शास्त्र आहे; तशीच ती एक कलाही आहे.

हे शास्त्र पुरातन काळापासून विकास पावत आलेले आहे.

गुन्ह्याच्या स्थळाचे सूक्ष्म निरीक्षण कसे करावे, साक्षीदारांचा शोध करून त्यांच्याजवळ पूसतपास कशी करावी, यांविषयी क्रिमिनल मॅन्युअलमध्ये देऊन ठेवलेल्या सूचना आजही उपयुक्त ठरतात.

कित्येक संशयित केवळ भीतीने वा अन्य काही कारणांनी कबुलीजबाब देऊन मोकळे होतात.

त्यांच्याबाबत कशा प्रकारची सावधगिरी बाळगायला हवी, याचे चाणक्याने केलेले विवेचन म्हणजे त्याच्या विद्वत्तेचा व प्रगाढ अनुभवाचा रोकडा दाखलाच होय.

गुन्ह्याविषयी माहिती मिळविण्यासाठी गुप्तचरांचा उपयोग कसा करून घ्यावा, याचेही सविस्तर विवेचन अनेक ग्रंथांमध्ये पुस्तकांमधील क्रिमिनल कोर्टाच्या हायकोर्टाच्या सुप्रीम कोर्टाच्या निकालांमध्ये केलेले आढळते.

परिस्थितीजन्य पुराव्याच्या एका अंगाच्या दिशेने भारतीयांनी फारच मोठी प्रगती साधलेली होती.



माग काढण्याच्या या तंत्रात ते इतके निष्णात झालेले असत, की सामान्यांच्या दृष्टीला न दिसणाऱ्या वा दिसले तरी ओळखता न येण्याजोग्या पावलांच्या ठशांवरूनही ते खूप दूरपर्यंत माग काढू शकत.

या निष्णात मागाऱ्यांची मोलाची मदत भारतातील बहुतेक सर्व पोलिस-दलांना अगदी परवापरवापर्यंत होत असे.

चोराच्या अथवा अन्य गुन्हेगाराच्या शरीराच्या वासावरून माग काढण्यासाठी कुत्र्यांचा उपयोग केला जाऊ लागल्यापासून मात्र मागाऱ्यांचे महत्त्व ओसरले आहे.

परिस्थितीजन्य पुराव्याचे महत्त्व मात्र वाढतच चालले आहे.

गेल्या शतकापासून आरोपीचा, विशेषतः पोलीस अधिकाऱ्यांपुढे दिलेला, कबुलीजबाब पुरावा म्हणून ग्राह्य मानला जात नाही.

आजकाल भारतीय न्यायालये साक्षीदारांनी सादर केलेल्या पुराव्यावरही तितकासा विश्वास ठेवण्यास तयार नसतात.

त्यामुळे तर परिस्थितीजन्य पुरावा गोळा करणे, हेच गुन्ह्याच्या तपासाचे प्रमुख व अपरिहार्य अंग होऊन बसले आहे.

गेल्या ५०–६० वर्षांत तपासणीच्या कार्याला वैज्ञानिक संशोधनानेही मोलाचा हात लावलेला आहे, हेही तितकेच महत्त्वाचे आहे.

जगातील प्रत्येक व्यक्तीचे किंबहुना प्रत्येक पदार्थाचे स्वतःचे असे खास वैशिष्ट्य असते. तसेच कोणत्याही दोन व्यक्ती अथवा वस्तू परस्परसान्निध्यात राहिल्यास त्या सान्निध्याचीही चिन्हे त्यांच्यावर उमटतात.

या दोन नियमांवरच प्राधान्याने गुन्हातपासणीस उपयुक्त ठरणारे वैज्ञानिक तंत्र आधारलेले आहे.

प्रत्येक व्यक्तीच्या बोटांच्या टोकाच्या पेऱ्यांचे ठसे इतके अटळपणे भिन्न स्वरूपाचे असतात, की कोणत्याही दोन व्यक्तींचे ते ठसे सर्वस्वी सारखे कधीच असू शकत नाहीत.

माग काढणाऱ्या कुत्र्यांना शरीराचा वास ओळखता येतो.

कोणत्याही दोन व्यक्तींच्या अंगाचा दर्प सारखा असत नाही.

यामुळे कुत्रे सुलभतेने वासावरून गुन्हेगारांचा माग काढू शकते.

अंगाचा दर्प त्या त्या व्यक्तीच्या नित्योपयोगी कपड्यांना व वस्तूंनाही येत असतो. त्यामुळे गुन्हेगाराची चुकून मागे राहिलेली वस्तू वा त्यांच्या पावलांचे ठसेदेखील वासावरून माग काढण्यास उपकारक ठरतात.

तसेच एकाच कारखान्यात एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर तयार झालेल्या वस्तू बाह्यतः जरी अगदी एकसारख्या दिसत असल्या, तरी त्यांत अतिसूक्ष्म फरक मुळातच राहून गेलेला असतो.

त्या वस्तूंचा वापर जसजसा अधिक केला जातो, तसतसा हा फरकही वाढत जाऊन ठळक होत असतो.

प्रत्येक व्यक्तीचे हस्ताक्षरही वैशिष्ट्यपूर्ण असते.

वादविषय झालेले हस्ताक्षर विवक्षित व्यक्तीचे आहे की नाही, याचा निर्णय त्याच व्यक्तीने लिहिलेल्या दुसऱ्या एखाद्या मजकुराशी तुलना करून तज्ञांना चटकन करता येतो.

कोणतीही व्यक्ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेली की नाही, याची पारख तिच्या पादत्राणांना चिकटून राहिलेल्या धुळीच्या कणांच्या आधारे होऊ शकते.

कारण प्रत्येक ठिकाणचे धुलिकणही असेच वैशिष्ट्यपूर्ण असतात.

गुन्ह्याच्या स्थळी आढळलेले धुळीचे कण संशयिताच्या पादत्राणांना चिकटलेल्या कणांशी ताडून पाहून ती व्यक्ती गुन्ह्याच्या जागी गेली होती का नाही, हे ठरविता येते.

गुन्ह्याच्या जागी रक्त, केस इ. सापडल्यास त्यांचे पृथक्करण करून रक्त कोणत्या गटातील आहे, केस मानवाचे आहेत की पशूचे, मानवाचे असल्यास किती वयाच्या व्यक्तीचे इ. प्रकारचा निर्णय वैज्ञानिकांना देता येतो.

अलीकडे तर रक्त स्त्रीचे आहे की पुरुषाचे आहे, हेही ओळखता येऊ लागले आहे.

केस विवक्षित व्यक्तीचा आहे की नाही, हे अणुविज्ञानाच्या साहाय्याने निश्चित करता यावे, यासाठी अलीकडे डॉ. जर्व्हिस या कॅनेडियन शास्त्रज्ञाने संशोधन आरंभले असून त्यांचे काही प्राथमिक प्रयोग यशस्वीही ठरले आहेत.

त्यांचे सर्व प्रयोग संपूर्णतया सफळ झाल्यास, बोटांच्या ठशांइतकाच केसांचाही उपयोग व्यक्तीची निश्चित ओळख पटविण्यासाठी करता येईल.

मोटार-अपघात झाल्यानंतर संबंधित ड्रायव्हर मोटार घेऊन फरारी झाला असला, तरी अपघातस्थळी मोटारीच्या ज्या भागाची धडक बसली असेल, त्याचा रंग, तेल इ. अंश सूक्ष्म प्रमाणात तेथे चिकटून राहिलेला असतोच.

पुढे एखादी संशयास्पद गाडी आढळल्यास हे अंश तिच्या रंगाशी आणि तेलाशी वैज्ञानिक पद्धतीने ताडून पाहून, तीच मोटार अपघाताला कारण झाली की नाही, याचाही निश्चित निर्णय करता येतो.

गुन्ह्यात पिस्तुलाचा वा बंदुकीचा उपयोग केलेला असल्यास गोळी व कधी कधी तिच्या मागचे टोपणही गुन्ह्याच्या स्थळी पडलेले आढळते.

ती गोळी व टोपण विवक्षित हत्यारातून उडवलेली असू शकेल की नाही, हेही वैज्ञानिक परीक्षणाच्या साहाय्याने निश्चितपणे सांगता येते.

अगदी एखादे फाटके चिंधुक मिळाले, तरीही त्याची तुलना संशयिताच्या कपड्यांशी करता येते.

अशा प्रकारच्या असंख्य वस्तूंचे किंवा मागे राहिलेल्या सूक्ष्म अवशेषांचेही परीक्षण करणे शक्य असल्यामुळे गुन्ह्याच्या स्थळाचे पराकाष्ठेच्या बारकाईने निरीक्षण करणे, हा तपासणीतला एक अत्यंत महत्त्वाचा कार्यभाग ठरतो.

याच दृष्टीने पोलीस-प्रशिक्षण संस्थांमधून या विषयाचे सांगोपांग शिक्षण देण्यात येत असते.

पोलिस अधिकाऱ्यांना तपास करणे सुलभ व्हावे, म्हणून वैज्ञानिक साधनांवर आधारलेल्या आधुनिक गुन्हा-अन्वेषणाचे यथार्थ शिक्षण देण्यासाठी भारत सरकारने आता कलकत्ता येथे एक गुप्तचर-प्रशिक्षण-संस्थाही स्थापन केली आहे.

विभिन्न राज्यांतील अधिकाऱ्यांना या संस्थेत खास प्रशिक्षण दिले जाते.

प्रत्येक राज्याच्या गुन्हा अन्वेषण विभागात बोटांच्या ठशांचा संग्रह, विविध क्षेत्रातील तंत्रज्ञ, छायाचित्रे घेण्याची यंत्रणा अशा प्रकारची सर्व व्यवस्था सज्ज ठेवलेली असते. काही जिल्ह्यांतील पोलीस अधीक्षकांच्याही कार्यालयांत तज्ञ नेमलेले असतात.

जवळजवळ प्रत्येक राज्यातील विवक्षित केंद्रात आता वासावरून माग काढणाऱ्या कुत्र्यांचीही व्यवस्था केलेली आहे.

गुन्ह्याच्या तपासणीला उपकारक ठरणाऱ्या वैज्ञानिक प्रयोगशाळाही आता राज्यात उभारलेल्या आहेत.

कित्येक मोठमोठ्या शहरांत गुन्ह्याच्या स्थळी तपासासाठी पोलीस अधिकाऱ्यांच्या जोडीला बोटांच्या ठशांचे तज्ञ व पोलीसदलाचे छायिचित्रकारही हजर असतात.

खुनाच्या वा हाणामारीच्या गुन्ह्यात बळी पडलेल्या वा जखमी झालेल्या व्यक्तीची शवपरीक्षा करण्याची सोय प्रत्येक तालुक्याच्या शहरी उपलब्ध असते.

मृत्यू नैसर्गिक रीत्या आला की अनैसर्गिक, तो कशामुळे व साधारणतः कोणत्या वेळी आला, शवावर आढळलेल्या जखमा मृत्यूच्या पूर्वी झालेल्या आहेत की नंतर, त्या कशा प्रकारच्या हत्याराने झालेल्या असतील इ. माहिती शवपरीक्षेद्वारा मिळविता येते.सांगोपांग वैज्ञानिक परीक्षण पुरे झाल्यावर आणि मागारे वा कुत्रे यांनी योग्य माग काढल्यानंतर तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्यांना थोडीबहुत उपयुक्त माहिती आणि साहाय्य मिळू शकते.

साक्षीदार परिचित गुन्हेगाराची नावे सांगून टाकतो वा ते अपरिचित असल्यास त्याचे वर्णन तरी करतो.

गेली काही वर्षे ‘आयडेंटी किट’ नावाचे नवे उपकरण अमेरिकेत वापरले जाते. त्यात अगदी पूर्ण पारदर्शक असलेल्या तबकड्यांवर नाना प्रकारच्या जिवण्या, नाके, डोळे, भुवया, पापण्या, दाढीमिशा, चष्मे, कान, केशरचना इत्यादींची वेगवेगळी चित्रे रेखाटलेली असतात. या किटमध्ये प्रत्येक अवयवाच्या निदान वीसपंचवीस तरी वेगवेगळ्या तबकड्या असतात. साक्षीदारांकडून अपरिचित गुन्हेगाराच्या वर्णनाचा सर्व तपशील गोळा केल्यावर त्याच्याशी जुळणाऱ्या सर्व अवयवांच्या तबकड्या व्यवस्थितपणे एकावर एक ठेवून संपूर्ण चेहेरा सिद्ध केला जातो.

तो गुन्हेगाराच्या चेहेऱ्यासारखा असल्याचे आढळून आल्यास त्याची छायाचित्रे काढून ती सर्वत्र पाठविली जातात. हे उपकरण अजून नवीन असले, तरी त्याच्या साहाय्याने कित्येक गुन्हेगारांचा शोध लावण्यात यश लाभलेले आहे.

एखादा गुन्हेगार माहितीतला नसेल, तर गुन्ह्यांच्या तंत्राविषयी जमा केलेल्या माहितीचाही उपयोग शोध लावताना होऊ शकतो.

विशिष्ट पद्धतीने गुन्हा करण्यात एकदा यश आले, की गुन्हेगार नेहमीच त्या पद्धतीचा अवलंब करू लागतो.

एका प्रकारच्या घरफोडीत लग्गा साधला, की चोर बहुधा त्याच प्रकारच्या घरफोड्या करण्यास प्रवृत्त होतात. त्या त्या गुन्हेगारांच्या काही विशिष्ट लकबी असतात. काही चोर चोरी केल्याबरोबर घरातल्या खाद्य पदार्थांवर तुटून पडून त्यांचाही फडशा उडवतात.

कोणी चोहीकडे विड्यांची थोटके विखरून टाकतात.

जिथे डाका घातला, तिथल्या स्त्रियांशी काही दरोडेखोर अत्यंत लीनतेने वागतात.

काहींचे साथीदारांना द्यायचे ठराविक इशारे असतात.

काहींनी आपली कार्यक्षेत्रे मर्यादित जागेपुरतीच आखलेली असतात. उदा., काही खिसेकापू कल्याण ते कर्जत या स्टेशनांच्या दरम्यान धावणाऱ्या स्थानिक गाड्यांतच प्रवाशांचे खिसे साफ करीत असतात.

अशा प्रकारचे नानाविध गुन्हे नोंदून ठेवून, गुन्हेगारांनी अवलंबिलेली तंत्रे, त्यांच्या विशिष्ट सवयी आणि लकबी, त्यांची कार्यक्षेत्रे इत्यादींचे सूक्ष्म विश्लेषण करून गुन्हे व गुन्हेगार यांविषयीची समग्र माहिती प्रत्येक जिल्ह्यातील आणि राज्यातील गुन्हा-अन्वेषण शाखेत (मोडस् ऑपरँडी ब्यूरो) संगृहीत करून ठेवलेली असते.

नव्याने घडलेल्या गुन्ह्यात अवलंबिलेल्या तंत्राची छाननी करून, त्याच पद्धतीने पूर्वी केलेल्या गुन्ह्यांचे तुलनात्मक निरीक्षण केल्यानंतर, ज्यांनी गुन्हा केला असा संशय दृढ होतो, त्या सर्वांची समग्र यादी तपासणी अधिकाऱ्याकडे रवाना करण्यात येते.अशा रीतीने गुप्तचर, बातमीदार आणि साक्षीदार यांच्याकडून मिळालेली माहिती, गुन्हे व गुन्हेगार यांच्या माहितीचा आधीच तयार करून ठेवलेला संग्रह, वैज्ञानिक तपासणीवरून निघणारी अनुमाने इत्यादींच्या समन्वयाने संशयित गुन्हेगार कोण असू शकेल, याचा सुलभतेने शोध घेता येतो. विज्ञानाची अशी परोपरीने मदत मिळत असूनदेखील गुन्हेगार माहितीतला नसला, तर गुन्ह्याच्या तपासाचे काम बिकटच ठरते. गुन्ह्याच्या स्थळी बोटांचे ठसे मिळाले, तरी अन्वेषण खात्यातील संग्रहात तसलाच ठसा न आढळल्यास गुन्हेगाराचा माग लवकर लागत नाही.

आधी अटक झालेल्या वा शिक्षा भोगलेल्या व्यक्तीचेच ठसे सामान्यतः संगृहीत करून ठेवलेले असतात.

देशातील एकूण एक नागरिकांच्या बोटांचे ठसे घेऊन ठेवण्याची प्रथा कुठेच अस्तित्वात नाही.

गुन्हेगाराचे रक्त, केस वा कपड्याची चिंधी गुन्ह्याच्या जागी सापडली, तरी प्रत्येक गुन्हेगाराचा पत्ता लागेपर्यंत या वस्तूंची तुलना त्याच्या तसल्याच वस्तूंशी करता येत नाही. अशा परिस्थितीत प्रत्येक संशयिताचे ठसे व वस्तू तुलनेसाठी वापरून संशयाची शहानिशा करून घेणे अटळ ठरते. परंतु निरपराध व्यक्तीवरील संशयाचा मात्र त्यामुळे निरास होतो.

आधुनिक युगात दळणवळणाच्या साधनांत अपूर्व क्रांती झाल्यामुळे, गुन्हेगार तडकाफडकी कोणते तरी वाहन पकडून निसटून जातात.

त्यांचा पाठलाग करण्यासाठी आणि दूरवर पळून गेलेल्या गुन्हेगारांची तेथील स्थानिक पोलिसांना माहिती पुरविण्यासाठी बिनतारी यंत्राचा (वायरलेस) चांगला उपयोग होतो.

शहरातील पोलीस दलांना आधुनिक वाहने पुरविण्यात येतात.

या वाहनांवरही बिनतारी संदेशवाहक यंत्रे बसविलेली असतात. त्यामुळे एका वाहनातील पोलिसांना दुसऱ्या वाहनातील पोलिसांशी संपर्क साधता येतो आणि पाठलागाचे काम सुलभ होते.

जिल्ह्याजिल्ह्यांतून बिनतारी संदेश पाठवण्यासाठी केंद्रे असतात. त्यामुळे देशाच्या सर्व विभागांशी संपर्क साधता येतो. आधुनिक दळणवळणाच्या सोयींमुळे अनेक गुन्हेगार निरनिराळ्या देशांत जाऊन गुन्हे करू शकतात.

अशा आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांची जंत्री व त्यांच्या कार्यपद्धतीची नोंद करण्यासाठी चालू शतकाच्या सुरुवातीला आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना (इंटरपोल) स्थापन झाली. ह्या संघटनेची मुख्य कचेरी पॅरीस येथे आहे.

जगातील बहुतेक सर्व देशांतील पोलीस संघटना इंटरपोलच्या सभासद आहेत.

इंटरपोलचे अधिकारी प्रत्यक्ष तपास करीत नाहीत. सर्व देशांत परकी नागरीकांनी केलेले गुन्हे व त्यांच्या गुन्हापद्धती यासंबंधीच्या माहितीचे संकलन आणि आंतरराष्ट्रीय गुन्हेगार टोळ्यांच्या सदस्यांच्या हालचालींच्या नोंदी ठेवणे, हे इंटरपोलचे प्रमुख कार्य असते. त्यासाठी देशादेशांतील पोलीस संघटनांशी सतत संपर्क ठेवला जातो. यामुळे आंतरराष्ट्रीय टोळीचे सदस्य आपल्या देशात आल्याची वर्दी कित्येकदा ताबडतोब मिळते आणि त्यांच्या हालचालींवर सतत देखरेख ठेवणे शक्य होते.

इंटरपोलच्या सहकार्याने एका देशात गुन्हा करून, दुसऱ्या देशात पळून गेलेल्या फरारी गुन्हेगारांना पकडणे सुलभ होते.

१९६६ साली आंतरराष्ट्रीय चोरटा व्यापार करणाऱ्या टोळीचा प्रमुख वॉलकॉट यास पकडण्याच्या कामी मुंबई पोलिसांना इंटरपोलची मदत मिळाली होती.

साक्षीदारांजवळ व अन्य व्यक्तीकडे पूसतपास करण्याची कलाही गुन्हाशोधविज्ञानाइतकीच महत्त्वाची आहे. याही कलेत आता खूप प्रगती झालेली आहे. पूसतपास करण्याच्या कलेविषयी आता कित्येक तज्ञांप्रमाणेच यशस्वी ठरलेल्या पोलिस अधिकाऱ्यांनीही आपापल्या सूचना ग्रथित करून ठेवलेल्या आढळतात. पण प्रत्यक्ष अनुभवाविना केवळ अशा पुस्तकांच्या अध्ययनानेच ही कला साध्य होणे, दुरापास्तच आहे.

भारतासारख्या बहुभाषिक देशात दर पाच कोसांवर भाषा बदललेली दिसते. निरनिराळ्या जातींचे व धर्मांचे लोक विवक्षित शब्द वेगवेगळ्या अर्थांने वापरताना दिसतात. भिन्न स्तरांतील लोकांची बोलभाषाही भिन्नच असते. गुन्हेतपासणी अधिकाऱ्यांना या भाषिक विविधतेची यथार्थ माहिती असावी लागते. प्रचलित समाजजीवनाचीही उत्तम माहिती असणे आवश्यक ठरते. तात्पर्य, तपासणी अधिकारी बहुश्रुत व स्थानिक रीतिरिवाज, समाजजीवन आणि भाषाभेद यांचा बारकाव्याने अभ्यास केलेला नसेल, तर तो यशस्वी होणार नाही. त्याला लबाडीची द्व्यर्थी उत्तरे देऊन साक्षीदार व संशयित व्यक्ती सहज फसवू शकतात.

गेली तीसचाळीस वर्षे काही अमेरिकन पोलीस अधिकाऱ्यांनी पॉलिग्राफ वा लाय डिटेक्टर वापरण्याची प्रथा पाडली आहे. रक्ताचा दाब, घामाचे प्रमाण, नाडीच्या ठोक्यांची गती इत्यादींची नोंद करण्याची व्यवस्था या उपकरणात असते. बेदिक्कतपणे खोटे बोलताना माणसाचा श्वासोच्छवास, रुधिराभिसरण, रक्तदाब, हृदयाचे स्पंदन इ. प्रक्रियांत पराकाष्ठेचे बदल होत असतात.

पूसतपास करताना या यंत्राचे साहाय्य घेतल्याने कोणती उत्तरे खोटी व कोणती खरी हे समजू शकते; पण हे यंत्र वापरण्यास संशयिताची खुषीची संमती असावी लागते. या उपकरणाने केलेल्या नोंदी न्यायालयात पुरावा म्हणून ग्राह्य मानल्या जात नाहीत. कारण शारीरिक प्रक्रियांत असत्यकथनासारखेच अन्य कारणांमुळेही परिवर्तन घडून येत असल्याने, शारीरिक प्रक्रियांतील परिवर्तनांची नोंद निर्विवाद पुरावा म्हणून ग्राह्य मानता येत नाही.

आजच्या युगात समाजरचनेत अधिकाधिक गुंतागुंत निर्माण होत चाललेली आहे. दळणवळणाच्या साधनांत घडून आलेल्या क्रांतीमुळे गुन्हेगार दूरदूरच्या ठिकाणी जातात आणि गुन्हे करून चटकन परत येतात.

मोठ्या शहरांतील दाट वस्तीत ते गुन्हा केल्यानंतर सुलभतेने अदृश्य होऊ शकतात. यामुळे गुन्ह्याच्या तपासणीत एकटादुकटा अधिकारी यश मिळवू शकत नाही. कधीकधी तर खूपच मोठ्या पोलीस दलाचा उपयोग करून घ्यावा लागतो. दूरदूरच्या पोलीस दलांचे साहाय्य मागावे लागते व सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे, जनतेचेही सहकार्य मिळवावे लागते.

लोकांनी गुन्ह्यांची वा गुन्हेगाराची स्वतःला असलेली माहिती तपासनिसांना सादर केल्याविना तपास परिपूर्ण होऊच शकत नाही.

कित्येकदा तर तपासणी अधिकाऱ्यांच्या ध्यानीमनीही नसलेल्या व्यक्तीला गुन्ह्याची माहिती असते.

पाश्चिमात्य देशांतील बहुसंख्य नागरिक आपण होऊन पोलिसांना माहिती देतात; पण भारतीय जनता व पोलीस यांच्यात मात्र अशी परस्परविश्वासाची भावना अजूनदेखील निर्माण झालेली नाही.वैज्ञानिक पद्धतीने गुन्ह्यांचा शोध करण्यात भारताने गेल्या पंचवीस वर्षांत खूपच प्रगती केली आहे.

आधुनिक साधने आणि वैज्ञानिक तंत्र यांच्या मोठ्या शहरांतून सर्रास उपयोग केला जात आहे.

महाराष्ट्र राज्यातील मुंबई, पुणे यांसारख्या शहरांच्या पोलीस दलांनी तर गुन्ह्यांचा तपास करण्याच्या कार्यात विशेष तत्परता व कार्यक्षमता प्रकट केली आहे. या क्षेत्रात मुंबई पोलीस दलाने तर समग्र भारतात अग्रस्थानाचा मान पटकावलेला आहे.जसजसे विज्ञान प्रगत होत जाईल, तसतसा त्याचा गुन्हातपासणीच्या कामात अधिकाधिक उपयोग करता येईल. त्या दृष्टीने तपासणी अधिकाऱ्यांना विज्ञानाने उघडलेल्या नव्या नव्या दालनांची तर माहिती उपलब्ध करून द्यायला हवीच; पण त्याच्या जोडीला विज्ञानाचा कुठे व कसा उपयोग करून घेता येतो, हेही त्यांच्या निदर्शनास आणायला हवे.

वैज्ञानिक तपासणी करून निर्णय देण्याचे काम फक्त तज्ञच करू शकणार. पोलीस अधिकारी ते काम करू शकत नाहीत. उलटपक्षी वैज्ञानिक परीक्षण करून दोन नमुने एकसारखे आहेत की नाहीत याचा निर्णय देण्यापलीकडे जास्त दायित्व तज्ञांनाही स्वीकारता येत नाही. गुन्ह्याच्या जागेची सूक्ष्मपणे पाहणी करून तेथील नमुने मिळविणे, तपास करताना गुन्हेगार वा संशयित व्यक्तीचा शोध काढून दुसरा तसाच नमुना जमा करणे, ही कामे केवळ अनुभवी व कार्यक्षम पोलीस तपासनीसच वा त्यांचे सहकारी करू शकतात. म्हणूनच गुन्ह्यांच्या तपासाच्या कामात वैज्ञानिक आणि तपासणी अधिकारी या दोघांचेही महत्त्व सारखेच आहे.

*येणेप्रमाणे दुसरे प्रकरण समाप्त*

- वि. वा. येलवे
वकील उच्च न्यायालय
८८९८३४३२८९

*जनहिता करता ही माहिती तुम्ही तुमच्या ग्रुपमधून प्रसारित करू शकता*

तसेच ज्यांना कोणाला *कायदा प्रशिक्षण अभियानामध्ये* सहभागी व्हायचे असेल ते वैयक्तिक वरील नंबर वरती संपर्क करु शकतात.
#समाजकल्याण #मराठीसाहित्य #कायद

*प्रकरण पाहिले**पहिली खबर*फौजदारी कारवाई दोन प्रकारे सुरू करण्यात येते१.पोलिसांकडे एफआयआर लिहून  (कलम  १५४ फौजदारी प्रक्...
26/09/2021

*प्रकरण पाहिले*
*पहिली खबर*
फौजदारी कारवाई दोन प्रकारे सुरू करण्यात येते

१.पोलिसांकडे एफआयआर लिहून (कलम १५४ फौजदारी प्रक्रिया संहिता )

२.मॅजिस्ट्रेटकडे खाजगी फिर्याद देऊन (कलम १९०, १५६-३,२०२फौजदारी प्रक्रिया संहिता )

यापैकी पहिल्या प्रकारामध्ये फक्त दखलपात्र गुन्हे उदाहरणार्थ मडर, रेप ,चोरी ,मारामारी इत्यादी गंभीर स्वरुपाचा गुन्ह्यांचा समावेश होतो.

एसआयआर किंवा पहिल्या खबरची व्याख्या जरी कायद्यामध्ये दिलेली नसली तरी फौजदारी प्रक्रिया संहिता कलम दोन ड मध्ये दिलेली आहे.

थोडक्यात पहिली खबर म्हणजे वेळेच्या दृष्टीने सर्वप्रथम पोलिस ठाण्यांमध्ये ठाणे अंमलदाराकडे दिलेल्या दखलपात्र गुन्ह्याची खबर होय.

मग असा गुन्हा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेला असो किंवा पोलिस ठाण्यांच्या हद्दीच्या बाहेर घडलेला असो.

तसेच खबर देणारा हितसंबंधी व्यथित असो किंवा नसो

अशी खबर लेखी अथवा तोंडी देता येते

अशा पहिल्या खबरीमध्ये बारीकसारीक तपशील असला किंवा नसला तरी चालते

*कायदेशीर बाजू*

१.ठाणे अंमलदाराकडे पहिली खबर गुन्ह्याची तोंडी दिल्या असत्या ठाणे अंमलदाराने ती लिहून काढावि.

२.ठाणे अंमलदाराने पहिली कबर लिहून काढल्यानंतर ती फिर्यादीला वाचून दाखवावी व फिर्यादीची सही घ्यावी.

३.पहिल्या खबर बुकांमध्ये ठाणे अंमलदाराने नमुने प्रमाणित लिहून नोंद करावी

४.नंतर पहिल्या खबर ची नक्कल विनामूल्य फिर्यादीला द्यावी

५.पहिल्या खबरची एक नक्कल ताबडतोब मॅजिस्ट्रेटकडे पाठवावी .

*पहिली खबर देताना फिर्यादीने काय लक्षात घ्यावे*

१. खबर देणारा घाबरलेला असेल त्यांनी सर्वप्रथम स्वत ला शांत करावे.

२.घटनेबद्दल माहिती असलेली सर्व माहिती ठाणे अंमलदाराला नि संकोच सांगावी.

३. घटना येथे घडली आहे तिथल्या कोणत्याही वस्तूला हात लावू नये किंवा हात लावल्या असल्यास त्याबद्दल माहिती ठाणे अंमलदाराला द्यावी

४.त्याला ही माहिती कशी मिळाली त्याबद्दल ठाणे अंमलदाराला सांगावे.

५. ठाणे अंमलदार फिर्याद लिहीत असताना कायदेशीर बाबी पूर्ण करत आहे की नाही याची खात्री करावी.

६.फिर्याद लिहून झाल्यानंतर ठाणे अंमलदाराने फिर्याद वाचल्यानंतर काय राहिले असल्यास ते अॅड करण्याची ठाणे अंमलदाराकडे विनंती करावी.

७ फिर्यादीची एक प्रत ठाणे अंमलदारांकडून मागून घ्यावी.

८.पहिल्या कबरीमध्ये ठाणे अंमलदाराने खबर देणारे चे नाव होय व्यावसाय पत्ता लिहिला आहे की नाही हे तपासून पाहावे.

९.गुन्हा घडला त्याची तारीख वेळ ठिकाण लिहिले आहे की नाही हे तपासून पाहावे.

१०.आरोपीचे नाव माहीत असल्यास त्याचे नाव फिर्यादीमध्ये लिहावे, माहीत नसल्यास अज्ञात इसम म्हणून फिर्यादीमध्ये नाव लिहावे आणि अज्ञात इसमाची वर्णन करावे माहिती असल्यास.

११.साक्षीदारांची नावे फिर्यादीमध्ये सांगावी व साक्षीदारांकडून त्यांची साक्ष नोंदवली गेली आहे की नाही याबद्दल माहिती घ्यावी .

१३.दुखापतींमध्ये वापरले गेलेले हत्यार त्याचे वर्णन करावे

१४. मालमत्तेच्या गुन्ह्यांत मालाचे , आकार, वजन ,किंमत इत्यादी चे वर्णन करावे. तसेच खुणा, चिन्ह यांचेदेखील वर्णन करावे

१५.नकारात्मक मजकूर फिर्यादीमध्ये लिहू नये.

१६.फिर्याद देण्यास विलंब झाला असल्यास फिर्याद देण्यास विलंब का झाला आहे त्याचे कारण लिहावे

*पहिली खबर पोलिसांनी न घेतल्यास*

पहिली खबर स्वतः पोलीस ठाण्यामध्ये जाऊन देता येते परंतु पोलिसांनी लिहून घेण्यास नकार दिल्यास

१.ताबडतोब त्यांच्या वरिष्ठांची भेट घ्यावी

२.एसीपी, डीसीपी, सीपी, एसपी, यांना आणि त्या पोलिस ठाण्याला लेखी तक्रार द्यावी.

२.लेखी तक्रार घेण्यास नकार दिल्यास ताबडतोब पोस्टाने लेखी तक्रार पाठवावी.

३ फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १५६ -३ प्रमाणे न्यायदंडाधिकारी यांच्याकडे एफआयआर रजिस्टर्ड करण्याकरता अर्ज करावा.

*पहिल्या खबर चे महत्त्व*

पहिली खबर खूप काळजीपूर्वक लिहिणे आवश्यक आहे.

काही विशिष्ट परिस्थितीत पहिल्या कबरीला पुराव्याचे रूप देता येते.

कोर्टात साक्ष देताना फिर्यादी किंवा साक्षीदार उलटले पहिली खबर ही च्या आधारे आणि वैद्यकीय कागदपत्रांच्या आधारे फिर्यादी आणि साक्षीदारांची उलटतपासणी सरकार पक्ष घेते
३फिर्याद दिल्यानंतर कोर्टात केस चालू होण्याकरिता बराच वेळ जातो त्या कामे फिर्यादी नेगी दिलेली साक्ष आहे ती घटना कशी घडली याचा इत्थंभूत माहिती त्यामध्ये असल्याकारणाने ती घटना पुन्हा फिर्यादी आणि साक्षीदारांना आठवून सांगण्यास मदत होते

पोलिसांना तपास करण्यास सुरवात करण्याकरता पहिली खबर अत्यावश्यक असते

फिर्याद दिल्यानंतर साक्षीदार घटनास्थळ यांचे पंचनामे करणे या कामी पहिली खबर अत्यंत मौल्यवान आहे

*पहिली खबर देताना खास सूचना आणि खबरदारी*

१.पहिली खबर त्वरित लवकरात लवकर लिहून द्या उशीर टाळा म्हणजे संशय वाढणार नाही

२.पहिली खबर साध्या सोप्या भाषेत द्या शक्यतो फिर्यादी ज्या भाषेत बोलतो त्या भाषेतच लिहावी

३.अतिशयोक्ती कल्पना मोघम विधाने पहिल्या खबरीमध्ये मध्ये टाळावी

४. पहिल्या कबरीमध्ये घटनेची वेल अत्यंत महत्त्वाची असते

५.फिर्यादीमध्ये खाडाखोड टाळा

६.एकदा पहिली खबर लिहिली की कोणत्याही कारणाने ती रद्द करता येत नाही

७गुन्हा घटना घडलेल्या जागेपासून पोलिस ठाणे किती अंतरावर आहे हे खबरी मधील लिहाव.

८पहिली खबर देऊन घेण्याचे नाकारले अगर लिहून घेऊन त्याचे गांभीर्य कमी करणे म्हणजेच मोठा गुन्हा घडलेला असताना पुण्याचे स्वरुप साधे दाखवणे दोषास पद गुन्हा आहे असे करणाऱ्या पोलिस अधिका यांवर भारतीय दंड संहिता कलम १६६. १६७. २१७. २१८ गुन्हा नोंद करता येतो.व त्याला त्यामध्ये दोषी आढळल्यास शिक्षा होते.तसेच डिपार्टमेंटल इन्क्वायरी त्याच्यावरती लागून त्याला सस्पेंड केले जाते.

येणेप्रमाणे आजचे पहिले प्रकरण समाप्त

- *अॅड वि. वा. येलवे*
*दि ग्रेट अशोका आर्मी*
*मुख्य संघटक राष्ट्रीय अध्यक्ष*
८८९८३४३२८९
*जनहिता करता तुम्ही तुमच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवरून शेअर करु शकता.*

26/09/2021

Address

Mumbai
400001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when का? कायद्याचा. By Adv. Vikee Yelve posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share