16/04/2020
चकवा
लाखो रुपये खर्च करून अयोध्या रेस्टॉरंटच ओपनिंग झालं. पॉश इंटेरियर. रेस्टॉरंटमध्ये प्रवेश करताच त्याच्या इम्पोर्टेड फर्निचर आणि इंटेरियर वर सुबोध ने केलेला खर्च दिसून येत होता. उद्घाटन तर झालं आता रेस्टॉरंट चालेल की नाही या चिंतेने आणि मनात थोडी भीती ठेवून सुबोधचा रेस्टॉरंट व्यवसाय चालू झाला. प्रचंड खर्च करून उभारलेले हे रेस्टॉरंट आणि त्यासाठी घेतलेले अवाढव्य कर्ज सुबोधच्या मानगुटीवर होतं सुबोध कष्ट तर खूप घेत होता पण रेस्टॉरंट मध्ये म्हणावी अशी ग्रोथ होत नव्हती. सुबोधला एकट्याने रेस्टॉरंट ची संपूर्ण मॅनेजमेंट करणे खूप कठीण जाऊ लागलं. तो आता नव्या पर्यायाच्या शोधात होता.
आपल्या मित्रांशी त्याने आपल्या मनातील समस्या बोलून दाखवली. प्रसेन सुबोधचा खास मित्र. प्रसेनने सुबोधला एक मार्ग सुचवला.प्रसेनचा दुसरा एका मित्र त्याचे नाव ओम, त्याने नुसतेच एमबीए पूर्ण केले होते. तोसुद्धा एक नवीन रेस्टॉरंट सुरू करण्याच्या विचारात होता. प्रसेनने ओमची भेट सुबोधशी करून दिली.
खूप चर्चे नंतर ओम आणि सुबोध यांनी सुबोधचे रेस्टॉरंट पार्टनरशिप वर एकत्र चालवण्याचे ठरवले. ओम मार्केटिंग मध्ये आणि इकॉनॉमिक्समध्ये फारच हुशार होता. मात्र ओमचा स्वभाव थोडासा उतावीळ स्वरूपाचा होता. त्याने रेस्टॉरंट, त्याचे लोकेशन, इंटेरियर, स्टाफ, कुक, रेस्टॉरंट मधून होणारा इन्कम, नफा-तोटा, याचे सगळे कॅल्क्युलेशन करून घेतले. हे रेस्टॉरंट व्यवस्थित चालवले तर करोडो रुपयाचा फायदा होऊ शकतो या निष्कर्षावर ओम आला. एवढा प्रचंड नफा, आपल्याला वर्षाकाठी कमीत कमी वीस ते तीस लाख रुपयांचा नफा तरी नक्कीच मिळेल या भव्य आकड्याने आमचे डोळे विस्फारले. आणि तो सुबोधशी पार्टनरशिप करण्यास उतावीळ झाला. कुठल्याही कारणामुळे त्याला आपल्या हातामध्ये आलेली ही संधी जाऊ द्यायची नव्हती. यासाठी ओम वाटेल ते करायला तयार होता. कारण त्याने काढलेल्या फायद्याच्या गणितावर त्याचा पूर्ण विश्वास होता.
मात्र रेस्टॉरंट उभारण्यासाठी संपूर्ण भांडवल सुबोधने घातले होते. आणि सुबोध ओम कडे 50% पार्टनरशिप च्याबदल्यात पंचवीस लाख रुपयांचे मागणी करत होता. पण ओम मध्यमवर्गीय कुटुंबातला. एमबीएचे शिक्षण त्याने लोन घेऊन पूर्ण केले होते. आता त्याला घरच्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास द्यावयाचा नव्हता.
हाती आलेली संधी जाईल या भीतीने त्याने सुबोध कडे एक प्रस्ताव ठेवला. की तो सध्या दोन लाख रुपये देऊन पार्टनर होईल आणि रेस्टॉरंटच्या होणाऱ्या नफ्यातूनच सुबोधचे उरलेले पैसे तो व्याजासहित परत करेल. सुबोधची याला कोणतीही हरकत नव्हती, मात्र त्याने ओम समोर एक अट ठेवली. जोपर्यंत ओमचे देणं असलेले सर्व पैसे व्याजासहित फिटणार नाहीत तोपर्यंत पार्टनरशिप एग्रीमेंट केले जाणार नाही. ही संधी जाऊ द्यायची नसल्याकारणाने ओमने या अटीला पटकन होकार दिला.
आणि ओम सुबोधच्या रेस्टॉरंटमध्ये पार्टनर म्हणून जॉईन झाला. सुबोध कडे प्रचंड पैसा असला तरी व्यवसाय चालवण्याचे स्किल नव्हते. या उलट परिस्थिती ओमची होती. ओमने पुढील तीन ते चार वर्ष अपार मेहनत घेऊन रेस्टॉरंट नावारूपास आणले. त्या शहरातील ते रेस्टॉरंट खूप नामांकित बनले. आणि ओमचे सुबोधला देऊ असलेले सर्व पैसेही निल होत आले. तशी ओमने सुबोध कडे पार्टनरशिप एग्रीमेंट बनवण्यासाठी विचारणा केली. मात्र सुबोधने काहीतरी थातुरमातुर कारणे सांगून चालढकल करण्यास सुरुवात केली. कारण त्याचा व्यवसाय अता नावारूपास आला होता. त्याला ओमची कोणतीच गरज उरली नव्हती.
आता तोच जाणून-बुजून ओमशी छोट्या छोट्या कारणांवरून भांडणे काढू लागला. एके दिवशी ओमने पार्टनरशिप एग्रीमेंट साठी जास्तच हट्ट धरला. आणि सुबोधने त्याला स्पष्ट सांगितले, "तू कसले पैसे इन्व्हेस्ट केले नाहीस, मग तू कसा काय पार्टनर? सारखा सारखा माझ्याशी भांडणारी असशील तर ताबडतोब माझ्या रेस्टॉरंट मधून चालता हो"
सुभोदच्याया बोलण्याने ओमला चांगलाच धक्का बसला. त्याचे तीन-चार वर्षांची मेहनत तर वाया गेलीच पण वडिलांकडून दोन लाख रुपये घेऊन सुबोध ला दिले तेही वाया गेले.
दुसऱ्या दिवशी ओम कमीत कमी दोन लाख रुपये तरी परत मिळवावेत याची विचारणा करण्यासाठी सुबोध कडे गेला. तरी सुबोधने "तुझा माझा काहीही संबंध नाही परत रेस्टॉरंट मध्ये पाय ठेवशील तर मला तुझ्या विरोधात पोलिसात तक्रार द्यावी लागेल"असे खडसावले.
आता ओम पूर्णपणे निराश झाला होता. त्याच्या पायाखालची जमीन सरकली होती. पैशाच्या हव्यासापोटी आणि लोभापायी कोणताही सारासार विचार केला नाही. घाईगडबडीत निर्णय घेऊन मोकळा झाला होता. त्याच्याजवळ कोणतंही रिटन डॉक्युमेंट नव्हतं, जेणेकरून तो स्वतःला अयोध्या रेस्टॉरंटचा पार्टनर सिद्ध करू शकेल, इतकच काय तर कामगार म्हणून पगार सुद्धा मागू शकत नव्हता. प्रचंड बुद्धिमत्ता असून सुद्धा फक्त पैशाच्या लोभापायी त्याने स्वतःच प्रचंड नुकसान करून घेतलं होतं.
जगात रोज अशी लाखो उदाहरणे घडतात. थोड्याशा पैशाच्या लोभापायी अनेक लोक स्वतःचे नुकसान करून घेतात. कोणी कितीही विश्वासातला असला आणि कितीही प्रचंड फायदा भेटणार असेल तरीसुद्धा लिखित पुरावा हा असलाच पाहिजे. आणि जर व्यवहार करत असताना समोरील व्यक्ती लिखित स्वरूपात व्यवहार करून देण्यास टाळाटाळ करत असेल तर या व्यवहारात नक्कीच घोळ असू शकतो, त्यामुळे वेळीच सावध व्ह्यायला शिका. लोभाला सद्सद्विवेकबुद्धी वर विजय मिळवू देऊ नका.
- Samrat legal services.
(Call now for a legal advice)