20/04/2026
सोलर वीज निर्मितीस प्रति युनिट १.८६ रुपये दंड
सौरवीजेचा वापर केवळ सकाळी ९ ते ५ करण्यास परवानगी, जिल्हा ग्राहक पंचायत संतप्त
▶ नाशिक : महाराष्ट्र शासनाचे सौर ऊर्जा योजनेबाबत ग्राहक विरोधी धोरण असून सोलर वीज निर्मिती करण्यास प्रति युनिट रु. १.८६ दंड आकारणार व सदर विजेचा फक्त सकाळी ९ ते सायं ५ पर्यतच वापर म्हणजेच. "सौरऊर्जा निर्मिती केल्यास दंड व शिक्षा" या काळ्या कायद्याचा जाहीर निषेध केला असल्याचे नाशिक जिल्हा ग्राहक पंचायतत उपाध्यक्ष प्रा. सुरेश पाटील यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.
प्रा. सुरेश पाटील म्हणाले की, "महाराष्ट्र शासन ऊर्जा विभागाने नविन अपारंपारिक ऊर्जा धोरणानुसार घरगुती व व्यावसायिक सोलर ऊर्जा निर्माण करणाऱ्या घरगुती वीज ग्राहक, हॉस्पिटल, रेस्टॉरंट, फॅक्टरी यांनी जर सोलर ऊर्जा स्वतःच्या पैशांनी वा पंतप्रधान प्रोत्साहन योजनेतून सबसिडी घेऊन तयार केली तर महाराष्ट्र शासनातर्फे प्रोत्साहन वर अशा सोलर वीज निर्मिती करण्यास प्रति युनिट रु. १.८६ दंड आकारणार व सदर वीज फक्त सकाळी ९ ते सायं ५ पर्यतच वापरावयाची, साठवून ठेवायच्या नाही, वीज कंपनीची वीजपुरवठा बद झाला तर ग्राहकाने अशी तयार केलेली सोलर वीज वापरायची नाही. तर त्याने सुद्धा वीज पुरवठा बंद मध्ये सामील होणे अनिवार्य केले आहे.
ग्राहकांनी तयार केलेली जादा सोलर वीज कंपलसरी वीज कंपनीलाच रु. ३.१० प्रतियुनिटने विकायची व त्याच ग्राहकास पुन्हा पावसाळ्यात व इतर वेळी वीज कंपनी कडून तीच वीज रु. १५ प्रति युनिटने विकत घ्यायची असे नियम सोलर ग्राहकांना प्रोत्साहनपर योजनेअंतर्गत वीज नियामक आयोगाकडून महाराष्ट्र शासनाने मंजूर केले आहे. व आता ग्राहक या नियमांना सोलर वीज निर्मिती विरोधी कायदा म्हणू लागले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्याकडे ऊर्जामंत्री पद असून
त्यांचे राज्यमंत्री अतुल सावे म्हणतात की, "वेळ आल्यास आम्हासही या सोलर जुलमी कायद्याविरुद्ध तक्रार करावी लागेल याची ग्राहकांनी नोंद घ्यावी". म्हणजेच संबंधित मंत्रीमहोदय जर असे म्हणत असतील तर सर्वसामान्य ग्राहकांनी काय करायचे? असा प्रश्न जिल्हा ग्राहक पंचायतीकडून विचारण्यात आला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या "सौरऊर्जा निर्मिती केल्यास दंड व शिक्षा" या काळ्या कायद्याचा नाशिक जिल्हा ग्राहक पंचायत निषेध करीत आहे व ग्राहकांनी याविरुद्ध आंदोलन करावे व आपआपल्या भागातील नगरसेवक, आमदारांना यांना जाब विचारावा "असे आवाहन नाशिक जिल्हा ग्राहक पंचायत उपाध्यक्ष प्रा. सुरेश पाटील, विलास देवळे, दुर्गेश पुराणीक, कृष्णा गडकरी, अनिल नांदोडे यांनी केले आहे.