15/01/2023
★पानिपतच्या पराभवाचा बदला★
लाख मराठा सैन्य धारातीर्थी पडलेल्या पानिपतच्या युद्धातील पराभव मराठ्यांच्या जिव्हारी लागला होता. माधवराव पेशव्यांनी बदला घेण्यासाठी महादजी शिंदे,तुकोजी होळकर, विसाजीपंत बिनीवाले,रामचंद्र कानडे यांच्या फौजा दिल्लीवर हल्ला करण्यासाठी रवाना केल्या.
मराठ्यांच्या फौजा त्वेषाने दिल्लीत शिरल्या.मराठ्यांनी दिसेल त्या अफगाण सैन्याला कापायला सुरुवात केली.मराठा फौजांनी लाल किल्याला वेढा दिला.
आक्रमक मराठ्यांच्या पुढे अफगाण सैनिकांनी शरणागती पत्करली.
मराठ्यांनी दिल्लीचा लाल किल्ला जिंकून नजिबखानाचा पुत्र झाबेदा खानला कैद केले.
मराठा फौजा दिल्ली बादशहाच्या दरबारात शिरल्या.दिल्ली बादशहाच्या सिंहासनाचे तख्त महादजी शिंदेंनी फोडले.मराठा फौजांनी शाहआलमला दिल्लीचा बादशहा बनवले.
शाहआलमने मराठ्यांना मुतालिकीची सनद देत दिल्लीचा कारभार सोपविला.
१७७१ ते १७९४ पर्यंत दिल्लीचा कारभार मराठा पाहत होते.
शहाआलमला बादशहा बनवून मराठा फौजा आताच्या हरियाणाच्या दिशेने निघाल्या.पानिपतचे युद्ध जेथे झाले होते तेथे पुन्हा एकदा मराठा ताकद मराठा सैन्याला दाखवायची होती.मराठ्यांनी पानिपत,सोनपत,बागपत,कुंजपुरा, शामली,फत्तरगड,घोसगड,नजिबाबाद सहजरित्या जिंकले.
अब्दालीचा सरदार नजीब खानाने पानिपत युद्धात लुटलेली ३० लाख रुपयांची लूट फत्तरगडमध्ये मराठ्यांनी लुटली.मराठा सैनिकांना कैदेतून मुक्त करत मराठ्यांनी पानीपतच्या पराभवाचा कलंक पुसला.मराठ्यांनी अफगाण सैन्यांची प्रचंड कत्तल केल्याने अब्दालीची पुन्हा भारतात येण्याची हिंमत झाली नाही.
शालेय अभ्यासक्रमात मराठ्यांचा पानिपत युद्धातील पराभव असतो,पण पानिपत युद्धातील पराभवाचा बदला मराठ्यांनी १७७१ साली कितीतरी अधिक मोठ्या प्रमाणावर घेतला होता,हे मात्र शिकवले जात नाही.हिंदूंच्या मनात पानिपत युद्धातील पराभवाचा न्यूनगंड रहावा,हाच लेफ्टिस्ट इतिहासकारांचा उद्देश.
इतिहासकारांच्या मते मराठा साम्राज्य हे हिंदू लुटारुंचे साम्राज्य होते.मराठा सैन्य लुटालूट करण्यासाठी पुण्यात जमा होऊन देशातील इतर भागात जायचे हे सत्य आहे.मराठा फौजांपासून रक्षण करण्यासाठी कलकत्ता शहरात बनवलेल्या "मराठा डिच" आजही आहेत,पण युद्धात लुटालूट त्याकाळी सामान्य बाब होती.
मराठा सैन्याची दहशत काय होती हे पाहायचे असेल तर कलकत्त्यात आजही असलेल्या "मराठा डिच" पहा. सदाशिवराव पेशवेंसह नागपूरच्या भोसल्यांच्या मराठा सैन्याने कलकत्त्यावर हल्ले करुन तेथे लुटालूट केलेली होती. मराठा सैन्यापासून बचाव करण्यासाठी कलकत्त्याभोवती "मराठा डिच" ही भिंत बांधली होती.
शालेय शिक्षणानंतर लोक पुन्हा इतिहास वाचत नाही.शालेय इतिहास हा शिवाजीराजे आणि संभाजीराजेंच्या कालखंडा भोवती फिरतो.त्यामुळे संभाजीराजेंची औरंगजेबने हत्या केल्यानंतरचा इतिहास मराठी लोकांनाच माहिती नसतो.मराठा साम्राज्याचा इतिहास आपण वाचला नाही तर भावी पिढीला तो इतिहास कसा समजणार.
"अटकेपार झेंडा लावणे" या वाक्यप्रचाराचा इतिहास रंजक आहे.
रघुनाथराव पेशव्यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी १७५७ मध्ये दिल्लीवर चाल करुन आलेल्या अब्दालीचा अटकपर्यंत पाठलाग करुन अटकपर्यंत मराठा साम्राज्य निर्माण केले होते.त्यावर अटकेपार झेंडा रोवणे हा वाक्यप्रचार रुढ झाला आहे.
मराठा सरदारांना एकसंध ठेवण्याचे काम जे पेशव्यांनी केले होते ते दुसऱ्या बाजीरावाला जमले नाही.
शिंदे,भोसले,होळकर,गायकवाड या मराठा सरदारांमध्ये शत्रुत्व निर्माण झाले.यशवंतराव होळकर हे एकटेच इंग्रजांशी लढत होते.मराठा सरदार जर एकत्र राहीले असते तर देशाचा इतिहास पूर्णपणे वेगळा असता.
दिल्लीत १७७१ साली हल्ला करुन मराठ्यांनी लुटलेले सोने भाजप नेते ज्योतिरादित्य शिंदेच्या १४६ वर्षे जुन्या आणि ४०० पेक्षा जास्त खोल्या असलेल्या ग्वाल्हेरमधील राजमहालातील दरवाजे,खिडक्या,टेबल,खुर्ची यांच्या नक्षीकामात आजही पाहायला मिळते.९० वर्षांनंतर ते सोने वापरण्यात आले.
दिल्लीत बाबर,हुमायून,औरंगजेब,अकबर या मुघल आक्रमकांची नावे रस्त्यांना आणि रेल्वे स्टेशनला काँग्रेस सरकारने हिंदूंच्या मनात न्यूनगंड निर्माण व्हावा यासाठी जाणूनबुजून दिली होती.
१७७१ साली मराठ्यांनी दिल्लीत ज्या अफगान रोहिल्लाला बडवले होते त्याचे नाव काँग्रेसने रेल्वे स्टेशनला दिले.
"मराठी नेते एकत्र आले की दिल्लीत घाबरगुंडी उडते.मराठ्यांच्या इतिहासाची दहशत दिल्लीत आजही आहे."असे माजी पंतप्रधान पी.व्ही.नरसिंहराव एकदा म्हणाले होते.
मराठ्यांना दुहीचा शाप आहे.तीन मराठी माणसे एकत्रित आली की त्यातील दोघेजण तिसऱ्याच्या विरोधात काड्या करायला सुरुवात करतात.
मराठा साम्राज्याच्या कालखंडात मराठ्यांच्या अनेक यशोगाथा आहेत,ज्यावर शेकडो चित्रपट बनतील, पण मराठी चित्रपटसृष्टीकडे ती झेप नाही.अपवाद सरसेनापती हंबीरराव चित्रपट सोडता. मराठा योद्धा बाजीरावांच्या जीवनावर चित्रपट बनवून संजय भन्साळीने ३०० कोटी रुपये कमावले,पण तसा चित्रपट बनवावा असे मराठी चित्रपट दिग्दर्शकाला सुचले नाही.